मुंबईच्या समुद्रात सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचा पहिला दगड रचण्याआधीच ते वादाच्या भोव-यात सापडले आहे. शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे. अन्यथा पुरंदरे यांच्यावर हल्ला करु, अशी धमकी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने दिली आहे. एवढेच नव्हे तर मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही दणका देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकाच्या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंग दाखवणारा लेझर शो असणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगांमध्ये कोणकोणत्या घटनांचा समावेश लेझर शोमध्ये करावा, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी शिवस्मारक समितीची बैठक बोलावली आहे. यावेळी शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात येणार आहे. बाबासाहेब पुरंदरे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असून, त्यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु मराठा महासंघाच्या धमकीमुळे आता या बैठकीत काय होणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ब्राह्मणीकरण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष राज्य सरकारने नेमलेल्या समितीने काढला आहे. परंतु आपल्या हयातीत पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव यांचे उदात्तीकरण करुन खोटा इतिहास लोकांना सांगितला. रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची एकदाही भेट झाली नव्हती. परंतु तरीही जणू काही हिंदवी स्वराज्याची प्रेरणा रामदास स्वामी यांनीच दिली, अशी समजूत ब्राह्मणी दृष्टिकोनातून पुरंदरे यांनी करुन दिली. त्यामुळे पुरंदरे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवावे. नाहीतर त्यांच्यावर हल्ला करु, अशी धमकी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर व संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.